फ्रँकलिन टेम्पलटनची ‘फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड’ योजना; 5 ऑगस्टपासून NFO खुला

अल्प ते मध्यम मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी डेट फंडाचा पर्याय; किमान गुंतवणूक 5,000 रुपये

मुंबई, 3 ऑगस्ट 2026: फ्रँकलिन टेम्पलटन (इंडिया) ने गुंतवणूकदारांसाठी ‘फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड’ (FISTF) ही नवीन म्युच्युअल फंड योजना सादर करण्याची घोषणा केली आहे. ही ओपन-एंडेड शॉर्ट टर्म डेट योजना असून, अल्प ते मध्यम मुदतीचा गुंतवणूक दृष्टिकोन असलेल्या गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे.

या योजनेच्या पोर्टफोलिओचा मॅकाले ड्युरेशननुसार कालावधी 1 ते 3 वर्षांचा असेल. फंडामधून उच्च दर्जाचे कॉर्पोरेट डेट सिक्युरिटीज, राज्य विकास कर्जे (SDL), सरकारी रोखे (G-Sec) तसेच मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे.

पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने AAA आणि AA+ रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट बाँड्ससह सरकारी रोख्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट क्वालिटीवर लक्ष केंद्रित करत अल्प ते मध्यम मुदतीत उत्पन्न मिळवण्याचा फंडाचा प्रयत्न असेल.

5 ते 11 ऑगस्टदरम्यान NFO

फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडचा न्यू फंड ऑफर (NFO) 5 ऑगस्ट 2026 रोजी खुला होणार असून 11 ऑगस्ट 2026 पर्यंत गुंतवणूक करता येईल. त्यानंतर नियमित खरेदी आणि रिडेम्प्शनसाठी ही योजना 13 ऑगस्ट 2026 पासून खुली होणार आहे.

योजनेत किमान 5,000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेत कोणतेही एक्झिट लोड आकारले जाणार नाही.

फंडाच्या कामगिरीची तुलना निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट इंडेक्स A-II या बेंचमार्कशी केली जाणार आहे.

कोण करणार फंडाचे व्यवस्थापन?

फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया फिक्स्ड इन्कमचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल गोस्वामी यांच्याकडे असेल.

त्यांना उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ मॅनेजर अनुज टगरा आणि रोहन मारू यांचे सहकार्य मिळणार आहे.

‘गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर भर’

फ्रँकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर यांनी फंडाच्या शुभारंभाबाबत सांगितले की, गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कंपनी आपली फिक्स्ड इन्कम श्रेणी अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे.

त्यांच्या मते, फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या डेट साधनांवर लक्ष केंद्रित करत उत्पन्नाची क्षमता आणि योग्य जोखीम व्यवस्थापन यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

फिक्स्ड इन्कम क्षेत्रातील अनुभवी टीम आणि मजबूत रिस्क मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने हा फंड बदलत्या बाजार परिस्थितीत गुंतवणूकदारांना त्यांच्या अल्प ते मध्यम मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

शॉर्ट टर्म डेट मार्केटमध्ये संधी

फंडाच्या गुंतवणूक धोरणाबाबत फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया फिक्स्ड इन्कमचे CIO आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल गोस्वामी यांनी सांगितले की, बदलत्या आर्थिक वातावरणात फिक्स्ड इन्कम मार्केटमध्ये अजूनही निवडक गुंतवणूक संधी उपलब्ध आहेत.

विशेषतः यिल्ड कर्व्हच्या अल्प मुदतीच्या भागात तुलनेने आकर्षक परतावा, पुरेशी तरलता आणि अनुकूल मागणी-पुरवठा परिस्थिती दिसून येत आहे.

फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड प्रामुख्याने उच्च दर्जाच्या कॉर्पोरेट डेटवर लक्ष केंद्रित करेल. त्याचबरोबर ॲक्टिव्ह ड्युरेशन मॅनेजमेंटच्या माध्यमातून बाजारातील संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

फंडाची रणनीती अल्प ते मध्यम मुदतीच्या यिल्ड कर्व्हमध्ये उपलब्ध संधींचा वापर करताना व्याजदर जोखीम आणि क्रेडिट रिस्कचे व्यवस्थापन करण्यावर केंद्रित असेल.

फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड : NFO ची प्रमुख वैशिष्ट्ये

योजनेचे नाव: फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड (FISTF)

योजनेचा प्रकार: ओपन-एंडेड शॉर्ट ड्युरेशन डेट स्कीम

पोर्टफोलिओ ड्युरेशन: मॅकाले ड्युरेशननुसार 1 ते 3 वर्षे

गुंतवणुकीचे उद्दिष्ट: विविध डेट आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करून अल्प मुदतीत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे. मात्र, योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही हमी नाही.

NFO कालावधी: 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026

नियमित खरेदी/रिडेम्प्शन: 13 ऑगस्ट 2026 पासून

किमान गुंतवणूक: 5,000 रुपये; त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत

फंड मॅनेजर्स: राहुल गोस्वामी, अनुज टगरा आणि रोहन मारू

बेंचमार्क: निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट इंडेक्स A-II

एक्झिट लोड: शून्य

कोणत्या गुंतवणूकदारांसाठी ठरू शकतो पर्याय?

फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडची रचना प्रामुख्याने अल्प ते मध्यम मुदतीत डेट मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी करण्यात आली आहे.

उच्च दर्जाच्या कॉर्पोरेट बाँड्स आणि सरकारी रोख्यांवर भर देतानाच फंड मॅनेजमेंट टीम बाजारातील व्याजदर आणि यिल्डमधील बदलानुसार पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन करणार आहे.

मात्र, डेट म्युच्युअल फंडांमध्येही व्याजदर, क्रेडिट आणि बाजाराशी संबंधित जोखीम असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे उद्दिष्ट, गुंतवणुकीचा कालावधी आणि स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि अटी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *